खासदार नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करत पाणी देखील नाकारल्याचा आरोप केला. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. आता राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम कदम म्हणाले, “या व्हिडीओबाबतची विशेष स्पष्टता स्वतः खासदार नवनीत राणाच देऊ शकतील. मात्र, दोन गोष्टी नाकारता येणार नाहीत. मुंबई पोलीस तीन पक्षांच्या सरकारच्या दबावात करत आहे. हे आपल्याला नाकारता येणार आहे का? मागच्या अडीच वर्षापासून मुंबईत मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांवर अत्याचाराचं सत्र सुरू आहे. मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये घेतले जात आहेत.”

“मंत्र्यांना कोट्यावधी रुपये देण्यासाठी खाली पोलीस ठाण्यांमध्ये हैदोस”

“मंत्र्यांना कोट्यावधी रुपये देण्यासाठी खाली पोलीस ठाण्यांमध्ये हैदोस मांडला गेलाय तो आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे चहा पितानाचं एक दृश्य या व्हिडीओत आलं असलं तरी त्या स्वतः खासदार आहेत. त्या म्हणतात मला पाणी नाकारलं. त्यामुळे आधी पाणी नाकारलं, नंतर वाद केल्यावर शांत करण्यासाठी चहा दिला का? या दोन्ही गोष्टी येतात,” असं राम कदम यांनी सांगितलं.

“प्रकरण आपल्या डोईशी येईल असं वाटल्याने चहा दिला असेल”

राम कदम पुढे म्हणाले, “खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा स्वतः म्हणत असतील की आम्हाला पाणी देखील नाकारलं, तर आपल्याला ती गोष्ट नाकारून चालणार नाही. वादानंतर ते खासदार आहेत, आमदार आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं असेल, पुढे जाऊन प्रकरण आपल्या डोईशी येईल असं वाटल्याने पोलिसांनी समजूत घालण्यासाठी राणांना चहा दिला असेल. साधारणपणे असंच होतं.”

हेही वाचा : पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ; म्हणाले “आता यापेक्षा जास्त…”

“सुरुवातीला वाद होतात आणि मग नंतर पोलीस समजूत घालतात”

“सुरुवातीला वाद होतात आणि मग नंतर समजूत घालण्यासाठी आम्ही जे करतोय ते वरून सांगण्यात आलंय, आम्ही करत नाहीये असं बोललं जातं. आम्ही पोलीस अधिकारी आहोत, आम्ही आदेशाचे ताबेदार आहोत, अशाप्रकारचे अनुभव मी स्वतः आमदार म्हणून अनुभवले आहेत,” असंही राम कदम यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ram kadam comment on viral video of mp navneet rana drinking tea in police station pbs