महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. या बैठकीमध्ये समन्वय समितीने आपली बाजू मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच टास्क फोर्सने या आयोजनाचे काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितल्यानंतर समन्वय समितीला राज्य सरकारची भूमिका पटल्याने त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र असं असलं तरी ही बैठक सुरु असतानाच भाजपाचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असं आव्हान राज्य सरकारला दिलं आहे.
नक्की वाचा >> दहीहंडीला परवानगी नाकारली : मुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय घडलं
“ही गोविंदा पथकं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही,” असं राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केलाय. “बियर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचं स्वागत करु, नियमांचं पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच,” असं राम कदम म्हणाले आहेत.
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 23, 2021
करोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं. हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं.
एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसं ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असं समन्वय समितीने सांगितलं आहे.