राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास महिना पूर्ण होत असून भाजपाने यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र त्यासाठी नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. यादरम्यान भाजपा आमदार श्वेता महाले यांनी गंभीर आरोप केला आहे.
नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले. आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. श्वेता महाले यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत गेली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली असं त्या म्हणाल्या आहेत.
नवाब मलिक यांना अटक ; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई
“शिवसेनेचे हिंदुत्व हे फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापुरतंच राहिलेलं आहे. ज्या दिवशी काँग्रेससोबत सत्तेत बसले, त्या दिवशी हिंदुत्वाला लाथ मारलेली आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहेत. ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले ते हिंदुत्व मात्र पक्षप्रमुख विसरले आहेत,” अशी टीका श्वेता महाले यांनी केली आहे.
“नवाब मलिक कोण आहेत…नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणलेत, शिवसेना भवनामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. यापेक्षा वेगळं पाहण्याची गरज नाही. उद्याला एमआयएम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही नाही,” असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.
“शिवसेनेचे हिंदुत्व हे ढोंगीपणाचं आहे, ते फक्त बोलण्यामध्ये दिसतं, प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचं हिंदुत्व कुठेही राहिलेलं नाही. ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलं आहे,” असं श्वेता महालेंनी म्हटलं आहे.
मलिकांवर आरोप काय?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आहे.
मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकटय़ा वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे (शेड) या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र, या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली, त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ‘ईडी’ला जबाबात सांगितले.
या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ‘ईडी’ने खानचा जबाबही नोंदवला आहे. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील ‘पॉवर ऑप अॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली, असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या, त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे.