खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या प्रकरणात न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काही नेते या विषयावर खुलेपणाने बोलत आहेत तर काही नेते कोर्टाचा विषय असल्यामुळे सावध पवित्रा घेत आहेत.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो ? असा सवाल पोलीस प्रशासनाला विचारला आहे. राजद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल केला जातो, हे पोलिसांना ठाऊक असायला हवे. पण राजा काहीही करू शकतो, तसेच सरकारही करू शकते, असेच म्हणावे लागेल. मात्र हा प्रकार काही बरोबर नाही. पोलिसांनी लावलेला गुन्हा न्यायालयाने काढून टाकला. ज्या पोलिसांनी हे केले, त्यांची जेव्हा केव्हा चौकशी होईल, तेव्हा या पोलिसांना तडीपार व्हावे लागेल, एवढे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

   नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याची भुमीका घेतली होती. यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा य दोघांनाही मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. राणा दाम्पत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत. यामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीवर आता वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे याची प्रत हातात आल्यावरच यावर बोलीन असा सावध पवित्रा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला आहे. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलेल्या निरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की “इतरांवर गुन्हे सिद्ध का होत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे”. 

  ओबीसी आरक्षण असो किंवा मशिदींवरील भोंग्यांचा विषय महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच किरीट सोमय्या यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या पाहिला मिळाल्या. तेव्हा विषय कुठलाही असो सध्या त्यावरून फक्त राजकारणच रंगतंय हेच खरं.