मुंबई : तेलंगणातील भाजप आमदार टी. राजसिंग ठाकूर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरारोड येथे २५ फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. कोणतेही द्वेषपूर्ण भाषण करणार नाही या हमीवर न्यायालयाने ठाकूर यांना ही परवानगी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकूर यांनी हे हमीपत्र मिरारोड पोलीस उपायुक्तांना ई-मेल किंवा फॅक्सद्वारे देण्याचे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले. त्याचवेळी संपूर्ण मिरवणुकीचे तसेच त्यात केलेल्या भाषणांचे ध्वनिचित्रण करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रोड ते सिल्व्हर पार्क एस. के. पर्यंत मिरवणूक काढण्यास मिरारोड पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर नरेश निळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या कार्यक्रमात ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे सांगून याचिकाकर्त्यांनी मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. दुसरीकडे, या मिरवणुकीत किंवा सभेत काही अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भीती सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी याचिकेला विरोध करताना व्यक्त केली. तसेच, अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठादिनी देखील मिरा-भाईंदरमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे न्यायालयाला सांगितले.

हेही वाचा – बाळासाहेबांचा विश्वास लाभलेला शिवसैनिक; नगरसेवक, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष..

ठाकूर यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणे दिल्याबद्दल तेलंगणासह अन्य राज्यातही गुन्हे दाखल असल्याची बाबही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, मिरारोड येथील कार्यक्रमातही ठाकूर यांच्याकडून असे भाषण केले जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला. त्यावर, ठाकूर यांच्याविरोधात तेलंगणा, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये गुन्हे दाखल असले तरी, १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. त्याचप्रमाणे, सोलापुरातील सभेलाही न्यायालयाने परवानगी दिली होती आणि त्या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावाही केला.

हेही वाचा – ‘नृत्य अकादमी’साठी हेमा मालिनी यांचा ‘भूखंडशोध’

दोन्ही बाजू ऐकल्यांनतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य केले. ठाकूर यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत ही वस्तुस्थिती आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, त्यांनी कोणतेही द्वेषपूर्ण भाषणे दिलेले नाही आणि त्यांच्या भाषणामुळे त्याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, असे नमूद करून न्यायालयाने ठाकूर यांच्या मिरवणुकीला परवानगी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla t raja singh thakur procession in mira road allowed mumbai print news ssb