मुंबई : गुरू तेग बहादूर नगर (जीटीबी) येथील २५ इमारतींचा बेकायदा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपाचे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्यासह पाचजणांना विशेष न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सेल्वन यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी १३ हजार ५०० रुपयांच्या दंडही यावेळी ठोठावला.
बेकायदेशीर सभा घेणे, दंगल घडवून आणणे, लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य करण्यापासून परावृत्त करणे आणि त्यांना मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सेल्वन यांच्यासह अन्य आरोपांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावली. मात्र, आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी विशेष न्यायालयाने शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, महापालिका अधिकारी जून २०१७ मध्ये जीटीबी येथील इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेले असता सेल्वन यांच्यासह अन्य आरोपींनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली.
हेही वाचा >>> कोट्यावधींच्या फसवणूकीतील आरोपींकडे सापडला मोबाईल व टॅब; रुग्णालयात उपचार घेताना सापडला मोबाईल
काहीही चुकीचे केलेले नाही; शिक्षेबाबत सेल्वन यांचे न्यायालयाला उत्तर
सर्व आरोपांत दोषी ठरवल्यानंतर शिक्षेबाबत तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा विशेष न्यायालयाने सेल्वन यांना केली. त्यावेळी, आपण काहीही चुकीचे केले नाही, असे उत्तर सेल्वन यांनी दिले. दुसरीकडे, आरोपींनी महापालिका अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखले व त्यांना मारहाण केली. आरोपींना शिक्षेत दया दाखवल्यास चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली. आरोपींना सरसकट शिक्षा न सुनावता ती त्यांच्या एकूण वर्तनाचा विचार करण्याची विनंती आरोपींच्यावतीने करण्यात आली. शिवाय, आरोपींचा हा पहिला गुन्हा असून ते चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे, त्यांना कमी शिक्षा सुनावण्याची मागणीही आरोपींतर्फे करण्यात आली.
हेही वाचा >>> दुरूस्तीच्या नावाखाली स्वातंत्र्यपूर्व काळातील इमारतीवर आठ बेकायदा मजले, इकॉनॉमिक हाऊसचे बेकायदा मजले तातडीने पाडा
प्रकरण काय ?
जीटीबी येथील पंजाबी वसाहतीतील एकूण १२०० घरे असलेल्या २५ इमारती पाडण्याच्या आदेशाच्या विरोधात जून २०१७ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी, महापालिका अधिकारी या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेले असता सेल्वन यांच्यासह अन्य आरोपींनी १०००-१२०० लोकांच्या बेकायदा जमावाचे नेतृत्व केले. तसेच, महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती.