मुंबई : राज्यात विक्री होणाऱ्या पनीरपैकी ७० टक्के पनीर बनावट असून, नागरिकांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा घरचा आहेर बुधवारी सत्ताधारी पक्षातील आमदाराने सरकारला दिला. त्यावर बनावट किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात ॲनालॉग, कृत्रिम किंवा बनावट पनीर या नावाने विक्री केला जात असल्याबाबत विक्रम पाचपुते, सुधीर मुनगंटीवार, कैलास पाटील आदी सदस्यांनी लक्षेवधी सूचना मांडली होती. सदस्य विक्रम पाचपुते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. दुधाऐवजी वनस्पती तूप वापरून बनविण्यात येणारा ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात पनीरच्या नावाने राजरोसपणे विक्री केली जातो. राज्यात दररोज विक्री होणाऱ्या पनीरपैकी ७० ते ७५ टक्के प्रमाण हे ॲनालॉग चीजते असते. ॲनालॉग चीज पनीर म्हणून विक्री होत असल्याने दुग्ध व्यवसायावरही विपरित परिणाम होत असून लोकांचीही फसवणूक केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘अनॉलॉग चीज’च्या नावाखाली कृत्रिम पनीर किंवा बनावट पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेऊन कायद्यात सुधारणा करण्यात येईल.फेक पनीरची विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ते अधिक कठोर करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या नियमांमध्ये बदल करण्यास संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना विनंती करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत अशा पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही पवार यांनी दिला.