गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत आपापला जिव्हा न सोडण्याच्या सूचना त्या त्या जिल्ह्याचे मंत्री आणि आमदारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर म्हणतात…
अतुल भातखळकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नका, अशी सूचना मंत्री आणि आमदारांना अजित पवारांनी दिली आहे म्हणे. बहुधा मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी”! करोना काळात देखील मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या मुद्द्याचं भांडवल करून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्याच मुद्द्याला धरून आता पावसाच्या संकटासमोर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे.
महाराष्ट्रावर पावसाचं संकट! काय आहे राज्य सरकारचा प्लॅन ऑफ अॅक्शन? जाणून घ्या!
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आल्यानंतर त्यावर देखील अतुल भातखळकर यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल… pic.twitter.com/LR0PZNgAtp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 24, 2021
शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला.