राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडूवन सातत्याने भाजपावर इतर पक्षांतील आरोप असणाऱ्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना क्लीनचिट दिल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात आता भाजपाच्याच एका आमदारानं विधानपरिषदेमध्ये सभागृह चालू असताना केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.
‘भाजपाकडे वॉशिंग पावडर’
इतर पक्षांमधून गेल्या काही महिन्यांत अनेकजण भाजपामध्ये गेले आहेत. तसेच, राज्याचा विचार करता महाराष्ट्रात तर तत्कालीन शिवसेनेतल्या आख्ख्या एका गटानेच एकनाथ शिंदेंबरोबर भाजपाशी हातमिळवणी केली. यापैकी अनेक आमदारांवर आधी भाजपाकडून भ्रष्टाचाराचे, आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, आता भाजपाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा टीका केली जात नसल्याचा मुद्दा विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातो. ‘भाजपाकडे वॉशिंग पावडर असून त्यात सगळ्यांना धुवून स्वच्छ करून घेतलं जातं’, असाही खोचक टोला विरोधकांकडून लगावला जातो.
भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशावर विधान
दरम्यान, याच टीकेचा संदर्भ घेत भाजपाच्याच एका आमदाराने आपल्याकडे निरमा वॉशिंग पावडर असल्याचं विधान केलं आहे. नुकतेच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, खुद्द सुभाष देसाई यांच्याही निष्ठेवर शंका घेण्यात आल्या. त्यावर देसाईंनी आपल्या निष्ठा उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरच असल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. त्यावरून भाजपा आमदार रमेश पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
“जो आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”
विधानपरिषदेत बोलताना रमेश पाटील यांनी भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर वक्तव्य केलं. “कुणीतरी काल सांगितलं की एमआयडीसीच्या प्लॉटची ४०० कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय. चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले आहेत.