आर्यन खान याला जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण काहीसं शांत होत असल्याचं दिसत असतानाच आता भाजपा नेते मोहीत कंबोज-भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केला आहे. आर्यन खान प्रकरण, कॉर्टेलिया क्रूजवर टाकलेला छापा आणि त्यानंतरची कारवाई या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील नावाची व्यक्ती असल्याचा दावा मोहीत भारतीय यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत भारतीय यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील पत्रकार परिषदेत ठेवले.

मोहीत भारतीय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील या सर्व प्रकरणामागचे मास्टर माइंड असल्याचा दावा केला आहे. “के. पी. गोसावीचा फोटो देशभरात चर्चेत राहिला. किरण गोसावी शाहरुखच्या मुलासोबत सेल्फी घेताना दिसला. दुसऱ्या फोटोमध्ये किरण गोसावी भाजपाचा कार्यकर्ता असून आर्यन खानला खेचून एनसीबीमध्ये घेऊन जातोय असं दिसलं. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे”, असं मोहीत भारतीय म्हणाले.

“सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. हे धुळ्याचे आहेत. २० वर्षांपासून त्यांचे राष्ट्रवादी पक्षासोबत संबंध राहिले आहेत. फक्त संबंधच नाही, तर नुकतेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांचे ते चांगले मित्र आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत. अनिल देशमुखांवर इडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत होते. १९९९ ते २०१४पर्यंत सुनील पाटील यांचं रॅकेट अॅक्टिव्ह होतं. २०१४मध्ये सरकार बदलल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले. २०१९नंतर सुनील पाटील पुन्हा महाराष्ट्रात, मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बदल्यांचं रॅकेट चालवत आहेत. यात महाविकासआघाडीच्या अनेक मंत्र्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत”, असं देखील ते म्हणाले.

Aryan Khan Case : “तपासातून हटवलेलं नाही”, समीर वानखेडेंच्या या दाव्यावर नवाब मलिकांचा पलटवार; म्हणाले…!

सुनील पाटील यांची नेमकी भूमिका काय?

मोहीत भारतीय यांनी सुनील पाटील यांची आर्यन खान प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. “सॅम डिसूझा नावाच्या माणसाचा उल्लेख नवाब मलिक, संजय राऊत, प्रभाकर सईलच्या प्रतिज्ञापत्रातही आहे. सुनील पाटील यांनी सॅम डिसूजाला १ तारखेला व्हॉट्सअॅप मेसेज केला. नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यांनी सांगितलं माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. एनसीबीच्या कुठल्यातरी अधिकाऱ्याशी बोलणं करून दे. सॅम डिसुजानं एनसीबीमधले एक अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्याशी बोलणं केलं. मग सॅम डिसूजानं सुनील पाटील यांच्याशी बोलणं केलं”, असं मोहीत भारतीय म्हणाले.

“२ ऑक्टोबरला सुनील पाटील यांनी सॅम डिसूजाला सांगितलं माझ्या माणसाला तुम्ही एनसीबीच्या एका व्यक्तीची भेट घालून द्या. माझ्याकडे खूप सारी माहिती आहे. सॅमनं कोण माणूस आहे? असं विचारलं असता सुनील पाटील यांनी किरण गोसावी असं नाव सांगितलं. सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजाला किरण गोसावीचा नंबर दिला आणि पुढील कारवाई करण्यासाठी किरण गोसावी मदत करेल असं सांगितलं”, असा दावा मोहीत भारतीय यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Story img Loader