राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. यावेळी बोलताना शरद पवारांनी महाविकासआघाडीचं कौतुक देखील केलं होतं. मात्र, शिवसेनेबाबतच्या त्यांच्या विधानावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे.भाजपा आमदार राम कदम यांनी यासंदर्भात शरद पवारांना लक्ष्य केलेलं असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर खोचक ट्वीट केलं आहे. “शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना महाविकासआघाडीचं भवितव्य आणि लोकसभा-विधानसभेविषयी वक्तव्य केलं होतं. “हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही”, असं पवार म्हणाले होते. त्यावरून भाजपाकडून खोचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पवार कधीही सेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत!

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ घेऊन भाकित देखील केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित राणेंनी या ट्वीटमध्ये केलं आहे.

उद्धव ठाकरे-मोदी वैयक्तिक भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, याआधी शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भाजपा आमदार राम कदम यांनी देखील टीका केली होती. “शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे”, असं राम कदम म्हणाले आहेत.

 

विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी ही शरद पवारांची खेळी असल्याच्या आशयाने टीका केली असताना, त्यांच्याच पक्षाचे राम कदम यांनी मात्र शिवसेनेचं कौतुक करणं ही शरद पवारांची हतबलता असल्याची टीका केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp narayan rane mock sharad pawar comment on ncp alliance with shivsena for loksabha pmw