महायुतीचे व विशेषत: भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले असतानाच, नितीन गडकरी यांचा गड असलेल्या विदर्भात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी चार जिल्हा परिषदांमध्ये मांडीला मांडी लावून बसले असून तेथे मैत्री मात्र घट्ट आहे.
बीडमध्ये रविवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात शरद पवार, अजित पवार व राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. सत्तेत आल्यास अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा मुंडे यांनी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात महायुतीने आक्रमक भूमिका घेतली असली तरी जास्त रोख राष्ट्रवादीवरच आहे. मुंडे यांचा पवार विरोध जगजाहीर असताना गडकरी यांचे मात्र नेहमीच पवारांशी मैत्रीचे संबंध राहिले आहेत.
भाजप आणि शरद पवार यांचे पडद्याआडून गुफ्तगू सुरू असल्याचे बोलले जाते. पवार यांनी मोदी यांचे केलेले समर्थन वा उभय नेत्यांच्या भेटीच्या चर्चेने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जाऊ लागले. मुंडे हे पवार यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत असतानाच नितीन गडकरी यांची भूमिका मवाळ आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचाही काँग्रेस हा समान शत्रू असल्याने विदर्भात दोन्ही पक्षांची घट्ट मैत्री आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने विदर्भातील युती तोडावी, असे आवाहन मागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले असता राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. विदर्भातील तीन-चार जिल्हा परिषदांमध्ये आघाडी असली तरी ती स्थानिक पातळीवरील असून, त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

Story img Loader