तौते चक्रीवादळ मुंबईला धडकलं नसलं, तरी त्याचा फटका मुंबईच्या किनारी भागांना बसला आहे. तसाच तो महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारी भागांना देखील बसला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारी भागामध्ये वादळी पाऊस आणि त्यानंतर काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतला एक व्हिडिओ शेअर करून थेट पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ. याच मतदारसंघातून निवडून ते विधानसभेवर गेले आहेत. तौते चक्रीवादळानंतरचा वरळीमधला एक व्हिडिओ निलेश राणे यांनी ट्वीट केला असून त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असल्याचं दिसत आहे. चिंचोळ्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होत. आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईत साचणारं पाणी, तुंबणारे नाले आणि लोकांची होणारी ससेहोलपट हे चित्र दरवर्षी दिसत असताना या वर्षी पावसाळा नसताना ऐन उन्हाळ्यात चक्रीवादळामुळे पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

“ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली?”

“हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही”, अशा शब्दांत निलेश राणेंना आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

 

नितेश राणेंचीही आगपाखड!

दरम्यान, निलेश राणे यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारकडून कोकणाला देण्यात आलेल्या मदतनिधीवरून निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी कोकणाला तडाखा बसलेल्या चक्री वादळानंतर राज्य सरकारने जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती, याविषयी त्यांनी ट्वीटमध्ये आक्षेप घेतला आहे.

 

Story img Loader