पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रा. स्व. संघ यांच्याबद्दल वादग्रस्त विधानांची आमदार राज पुरोहित यांची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यावर टीकेचा भडिमार सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपने पुरोहित यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली असून, तीन दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. पुरोहित यांच्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून, त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला नाही तरी पक्षात त्यांची किंमत शून्य केली जाईल, असे सांगण्यात येते.
राज पुरोहित यांच्या आरोपांमुळे भाजपची  अडचण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने आमदार पुरोहित यांना नोटीस बजाविली असून आपली ही कृती पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे, असे म्हटले आहे. तीन दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध वृत्तवाहिन्यांवर ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यावर आमदार राज पुरोहित यांनी ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला आहे. ध्वनिचित्रफीतील आवाज माझा नाहीच, असा युक्तिवाद करताना मला बदनाम करण्याकरिता हे सारे कुभांड रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच ध्वनिचित्रफितीची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार पुरोहित यांनी केली आहे.

पुरोहित यांची वादग्रस्त विधाने प्रसिद्ध झाल्याने भाजपच्या गोटात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. मंत्रिपद नाकारल्यापासून आमदार पुरोहित हे नाराज आहेत. आपण ज्येष्ठ असून आपल्याला डावलण्यात आले हे अनेकदा त्यांनी पक्षाच्या अन्य आमदारांजवळ बोलून दाखविले आहे. मेट्रो-३ प्रकल्पाबाबत भाजप आग्रही असताना गिरगावमधील इमारतींच्या मुद्दय़ावरही त्यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली होती.
या साऱ्यांमुळे पुरोहित यांच्या विरोधात कारवाई केली जाईल हे नक्की. मात्र, पक्षातील बडय़ा नेत्यांवर सध्या आरोप होत आहेत. त्यांची पाठराखण करण्यात येत आहे. अशा वेळी पुरोहित यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार नाही. त्यांना समज दिली जाऊ शकते. पण पक्षात त्यांना यापुढे फार महत्त्व दिले जाणार नाही, असे भाजपच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले.
विरोधकांची टोलेबाजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये खदखद दिसते, अशा शब्दांत भाजपवर हल्ला चढविला. तर पुरोहित हे खरे बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे फलक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावून भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. काँग्रेसनेही पुरोहित यांच्या विधानावरून भाजपमध्ये काय चालले आहे याचा अंदाज येतो, अशी टीका केली.