पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रा. स्व. संघ यांच्याबद्दल वादग्रस्त विधानांची आमदार राज पुरोहित यांची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यावर टीकेचा भडिमार सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपने पुरोहित यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली असून, तीन दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. पुरोहित यांच्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून, त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला नाही तरी पक्षात त्यांची किंमत शून्य केली जाईल, असे सांगण्यात येते.
राज पुरोहित यांच्या आरोपांमुळे भाजपची अडचण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने आमदार पुरोहित यांना नोटीस बजाविली असून आपली ही कृती पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे, असे म्हटले आहे. तीन दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध वृत्तवाहिन्यांवर ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यावर आमदार राज पुरोहित यांनी ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला आहे. ध्वनिचित्रफीतील आवाज माझा नाहीच, असा युक्तिवाद करताना मला बदनाम करण्याकरिता हे सारे कुभांड रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच ध्वनिचित्रफितीची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार पुरोहित यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा