राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते पोहोचत आहेत. दुसरीकडे भावाला भेटण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेदेखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अजित पवार यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण झटका वैगेरे नाही. डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे”.

धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट; मग नेमकं कारण काय?

“काल पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे असताना त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. त्यामुळे ते काही काळासाठी बेशुद्ध झाले होते. इथे आणलं तेव्हाही त्यांना शुद्ध नव्हती. एमआरआय वैगेरे झाल्यावर त्यांना शुद्ध आली,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेही धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. “गेल्या काही दिवसांत त्यांचा फार प्रवास झाला; उष्णता आणि दौरा यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. पण डॉक्टरच याविषयी जास्त सांगू शकतील. मी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. ते सध्या चांगल्या स्थितीत असून ते जास्त महत्वाचं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये टोपे यांनी, “काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील,” असा विश्वासही व्यक्त केलाय. धनंजय मुंडे हे ४६ वर्षांचे असून कामाच्या दगदगीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिलीय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja munde pritam munde reached breach candy hospital to meet dhananjay munde sgy