मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेची नीती भाजप राबवणार!
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कधी पालिका आयुक्तांना टार्गेट करत विकासकामे रोखायची, तर कधी थेट मेट्रो-३ प्रकल्पावरून भाजपला खिंडीत गाठण्याचे उद्योग शिवसेनेकडून सुरू आहेत. शिवसेनेकडून या संदर्भात सुरू असलेला अपप्रचार लक्षात घेऊनच, विकासकामांच्या विरोधात जे कोणी येतील त्यांना शिंगावर घेण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. शिवसेनेला हा अप्रत्यक्ष इशारा असून यापुढे मुंबईच्या विकासकामांची धडाक्यात उद्घाटने करून खरा विकास कोण करतोय ते मुंबईकरांपुढे उघड करण्याची योजनाही भाजपने आखली आहे.
एकीकडे विकासकामांवर लक्ष केंद्रित करताना जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटने आगामी काळात भाजपकडून धूमधडाक्यात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील व मुंबईमध्ये येणाऱ्या लक्षावधी प्रवाशांचा विचार करून मुंबई सागरी किनारा मार्ग, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्प, वांद्रे-विरार उन्नत मार्ग, सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाच्या कामांना गती देण्याचे काम जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामांचा नियमित आढावा घेत असून केंद्राकडूनही आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यात येत असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे विकासकामांमध्ये आडवे येण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांची तमा बाळगली जाणार नाही, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता दिला.
नालेसफाईच्या कामातील गाळ जातो कोठे तसेच नालेसफाईतील भ्रष्टाचार असो की रस्त्यांच्या कंत्राटातील घोटाळा असो, भाजपने याविरोधात प्रथम आवाज उठविल्याचे शेलार यांनी सांगितले. जकात नाक्यावरून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताना एसआयटी चौकशीची मागणी भाजपने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर गेल्या चार महिन्यांत जकातीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. पालिकेतील भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांचे राजकीय नेत्यांशी असलेल्या साटेलोटय़ामुळे विकासकामांचा दर्जा राहात नाही हे लक्षात घेऊन आयुक्त अजोय मेहता यांनी कंत्राटदारांची नाकेबंदी केली. आयुक्तांचे स्वागत करण्याऐवजी स्थायी समितीत आयुक्तांची अडवणूक करण्याचे काम सेनेसह विरोधी पक्षांकडून करण्यात येत असल्यामुळे आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आणि मुंबईच्या विकासकामांच्या आड येणाऱ्यांचा चेहरा उघडा पाडण्याचा निर्धार भाजपने केला आहे. वांद्रे-विरार उन्नत मार्ग, मुंबई सागरी किनारा मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग आदी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कामांच्या माध्यमातून आता भाजप ‘करून दाखविल्या’ची जाहिरात सेनेच्या नाकावर टिच्चून करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘नडला त्याला गाडला’ हे सेनेचे सूत्र आहे. शिवसेना हा भाजपचा सत्तेतील भागीदार असल्याने, भाजपदेखील याच सूत्राचा अवलंब करेल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा