हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दाचा अर्थ भाजपला कळत नाहीये, असं बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी या शब्दाचा अर्थ भाजपच्या लोकांनी शब्दकोशात तपासून पहावा असेही नवाब मलिक म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदूवी या शब्दाचा खेळ भाजपने खेळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मदारी मेहत्तर तोफखान्याचे सरदार होते, इतर प्रमुख दलाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलेलं नाही. मात्र भाजपचे लोक चुकीचा इतिहास काही लोकांना पुढे करुन या देशाचा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत गैरसमज निर्माण करत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील का म्हणाले होते ?

राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही पुन्हा टीकेचं सत्र सुरु झालं आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली असं मी म्हणालो. याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली, तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय?. या वक्तव्याविरोधात कोणीतरी निदर्शन करणार होतं, मला धमकीही आली होती. पण आम्ही कोणाला छेडणार नाही, पण कोणी छेडलं तर त्याला सोडणार नाही” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देतांना केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp playing a game to reduce the personality of shivaji maharaj asj