मुंबई अध्यक्षासह चार जिल्हाध्यक्ष मराठी भाषिक; पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून पक्षाची व्यूहरचना
मराठी माणूस आणि मराठी मते यांच्या जोरावर राजकारण करून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या हाती ठेवणाऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने आता मराठीचेच ‘कार्ड’ वापरण्यास सुरुवात केली आहे. भाजपमध्येही ‘मराठी बाणा’ असल्याचे दाखवून देण्यासाठी पक्षाने मुंबई अध्यक्षासह शहरातील सहापैकी चार जिल्हाध्यक्ष मराठी भाषिक नेमले आहेत. एकीकडे शिवसेना आणि मनसे मराठी मतदारांच्या पाठबळावर आपली ताकद वाढवत असताना भाजपनेही या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे.
गुजराती, जैन आणि उत्तर भारतीय समाजातील मतांच्या जोरावर मुंबईच्या राजकारणात टिकून असलेल्या भाजपने आतापर्यंत राज पुरोहित, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या अशा अमराठी व्यक्तींवर पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अलीकडच्या काळात अॅड. आशीष शेलार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेलार हे अगदी सुरुवातीपासून महापालिकेच्या गैरकारभाराकडे बोट दाखवून शिवसेनेला ‘लक्ष्य’ करत आहेत. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे भाजपने ठरविल्याने आणि शिवसेनेला सत्तेवरून खेचायचे असल्याने आक्रमकपणे शिवसेनेविरोधात लढणाऱ्या अॅड. शेलार यांचीच फेरनियुक्ती अध्यक्षपदी होणार आहे. मुंबई भाजपमधील जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यातही मराठी नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्षपदी सुहास आडिवरेकर तर दक्षिण मुंबईत सिद्धार्थ गमरे यांची निवड झाली आहे. गमरे हे मागासवर्गीय आहेत. तर वायव्य मुंबईत आमदार अमित साटम आणि दक्षिण मध्य मुंबईत अनिल ठाकूर या मराठी नेत्यांचीच निवड झाली आहे. ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी नरेश चंदाराणा तर उत्तर मुंबईत श्रीकांत पांडे यांची निवड झाली आहे.
भाजपने चार जिल्हाध्यक्ष बदलले असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. याआधी उत्तर मुंबईत जयप्रकाश मिश्रा, वायव्य मुंबईत अभिजित सामंत, ईशान्य मुंबईत श्रीनिवास त्रिपाठी, दक्षिण मध्य मुंबईत विठ्ठल खरटमोल हे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना बदलण्यात आले असून साटम हे जिल्हाध्यक्षपदी निवडले गेलेले एकमेव आमदार आहेत.
गेली बरीच वर्षे मुंबई भाजपचा कारभार मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय अशा नेत्यांच्या हाती होता. या निवडणुकीच्या वेळी मात्र हे चित्र बदलण्याची खबरदारी पक्षाने जाणीवपूर्वक घेतली आहे. शिवसेना मराठी मतांच्या आणि कोकणवासीय मुंबईकरांच्या जोरावर सत्ता काबीज करीत असल्याने त्यांची ही मते तोडण्यासाठी मराठी नेत्यांकडेच पक्षाची सूत्रे असावीत, हे धोरण या निवडीमागे असल्याचे सूत्रांनी सांगितले. मारवाडी, गुजराती व उत्तर भारतीयांची काही प्रमाणात मते भाजपला मिळतातच. त्यामुळे भाजपने शिवसेनेला ‘लक्ष्य’ करण्यासाठी मराठी मतांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पुन्हा सेनेवर निशाणा
दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी अनिल ठाकूर यांची घोषणा चेंबूर घाटला गावातील सभेत मंगळवारी अॅड. शेलार यांनी केली. त्या वेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजपने मुंबईकरांसाठी कायमच संघर्ष केला आहे, असे सांगून शेलार म्हणाले, रस्ते व नालेसफाईत भ्रष्टाचार असून काही जण कंत्राटदारांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेट्रो तीन ते सात हे प्रकल्प सुरू होत असताना त्याला विरोध करण्यात येत आहे.’ त्यामुळे मुंबईच्या विकासाचे विरोधी कोण हे आता जनतेनेच ठरवावे, असे शेलार यांनी स्पष्ट केले.