राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी शिवसेनेच्या ऑनलाईन वर्धापन दिन सोहळ्यामध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला परखड शब्दांमध्ये सुनावलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र, यावरून महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र उभं राहिलं असून त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. “महाविकासआघाडी सरकरामधले पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा देत आहेत. यावरून त्यांच्यात कोणत्या प्रकारचं पक्षीय राजकारण सुरू आहे हेच दिसून येतं”, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
दोन्ही पक्षांच्या भूमिकांना छेद देणारं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य!
प्रविण दरेकरांनी केलेल्या ट्वीटमधून ही टीका करण्यात आली आहे. “महाविकासआघाडी सरकारमध्ये सत्तेत असूनही पक्षीय राजकारण नेमकं काय चालू आहे, याचं प्रत्यंतर उद्धव ठाकरेंच्या आवाहनातून आलं. एका बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा दिला. तो बाळासाहेब थोरातांनी खोडून काढला. म्हणजे पक्षातही मतभेद आहेत. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल असं सांगितलं. जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. आणि या दोन्ही पक्षाच्या भूमिकांना छेद देणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. यावरूनच या तिन्ही पक्षात काय चाललंय आणि काय होणार आहे, याचं चित्र उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यातून दिसून आलं”, असं प्रविण दरेकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना स्वबळाचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसचा कानपिचक्या दिल्या. “स्वबळ म्हणजे काय? करोना काळात देशातील, महाराष्ट्रातील नागरिक अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता लक्षात न घेता स्वबळाचा नारा दिला. आम्ही स्वबळावर आणू असं म्हटलं, तर लोक जोड्यानं हाणतील. लोक म्हणतील तुझी सत्ता तुझ्याकडे ठेव आणि माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार? हा विचार आपण केला नाही, तर आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे हे निश्चित”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “केवळ निवडणुका आणि सत्ताप्राप्ती हा विचार सर्वच राजकीय पक्षांनी बाजूला ठेऊन करोनाच्या संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार करायला हवा. ते न करता आपण विकृत राजकारण करत राहिलो, तर आपल्या देशाचं काही खरं नाही”, असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
उद्धव ठाकरे म्हणतात…तर लोक जोड्यानं मारतील – वाचा सविस्तर
काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय!
याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापाठोपाठ राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील “एकटं लढू द्या, मग बघुयात किस में कितना है दम”, असं म्हणत थेट मित्रपक्षांना आव्हानच दिलं. या पार्श्वभूमीवर सत्तेतील मित्रपक्षांमध्ये नेमकं काय चाललंय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.