उत्तर भारतीय मतांच्या बेगमीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

उत्तर भारतीय मतांच्या बेगमीसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘चोखा बाटी’ या कार्यक्रमाचे आयोजन दोन सप्टेंबरला करण्यात आले आहे. मुंबईत उत्तर भारतीयांचे प्राबल्य असतानाही त्यांना पुरेशा प्रमाणात सरकार, महापालिका, महामंडळे व अन्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात सत्तेत सहभाग मिळावा, अशी मागणी असून त्यांना डावलले जात असल्याने नाराजी आहे.

उत्तर भारतीय असलेल्या विद्या ठाकूर यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले व अधिकारही फारसे नाहीत. आर.एन.सिंग यांना आमदारकी देण्यात आली. पण समाजातील नेत्यांना त्याहून अधिक काही मिळाले नसून महामंडळे, सिध्दीविनायक मंदीर व अन्य ठिकाणी सत्तेत हिस्सा मिळाला पाहिजे, यासह त्यांच्या अन्य काही अपेक्षा आहेत. केवळ मतांसाठी वापर केला जातो, मात्र सत्तावाटपात डावलले जात असल्याची समाजातील नेत्यांची तक्रार आहे. त्यामुळे उत्तर भारतीय सामाजिक संस्थाचे सदस्य, व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते व अन्य अशा सुमारे पाच हजाराहून अधिक लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘चोखा बाटी’ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई भाजपने दोन सप्टेंबरला केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर भारतीयांशी संवाद साधतील, अशी माहिती मुंबई अध्यक्ष अ‍ॅड आशिष शेलार यांनी दिली.

निवडणुकीची तयारी

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीचा प्रचार करण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोचण्यासाठी भाजपने वेगवेगळ्या माध्यमांमधून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली हे मुंबईतील विविध क्षेत्रातील नामवंतांशी २० ऑगस्ट रोजी विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात संवाद साधणार आहेत. बूथ प्रमुखांची बैठकही २१ ऑगस्टला आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यास उपस्थित राहतील.

  • मुंबईत उत्तर भारतीयांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक असून साधारणपणे २० लाखाहून अधिक मतदार आहेत.
  • आगामी महापालिका निवडणुकीत गुजराती व उत्तर भारतीय मतांवर भाजपची मोठी मदार आहे. बरेचसे मराठी मतदार शिवसेनेकडे जातील, अशी भाजपची भीती आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांना अधिकाधिक आपल्याकडे वळविण्याची भाजपची रणनीती आहे.

 

Story img Loader