मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येऊन ठेपली तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटप हा महाविकास आघाडी आणि महायुतीत कळीचा मुद्दा ठरला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात ‘तू तू, मै मै’ झाले. दुसरीकडे, महाविकास आघाडीत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढला आहे.

महायुतीचे जागावाटप निश्चित करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले नेते पक्षांतरे करीत आहेत. कोकणात सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तेली यांच्या प्रवेशामुळे कोकणात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात शिवसेनेला (ठाकरे) तगडा उमेदवार मिळाला आहे. तेली यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी नारायण राणे व त्यांच्या पुत्रांवर घराणेशाहीचा आरोप केला. तेली हे एके काळी राणे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.

हेही वाचा >>>परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे हे मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे उल्लंघन; निवडणूक आयोग, महापालिकेच्या परिपत्रकाला आव्हान

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. सांगोला मतदारसंघातून लढण्याची साळुंखे यांची योजना आहे. दोन माजी आमदारांना प्रवेश देऊन शिवसेनेने (ठाकरे) भाजप आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का दिला आहे.

महाविकास आघाडीत वाद

संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीका केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अस्वस्थ झाले. त्यांनी राऊत यांना सुनावले. महाविकास आघाडीत अजूनही २५ ते ३० जागांचा तिढा कायम आहे. शुक्रवारी पुन्हा बैठक घेण्याचे प्रस्तावित होते, पण ही बैठक झाली नाही. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्री दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागावाटपाच्या चर्चेत लक्ष घातले आहे. तिन्ही नेत्यांशी चर्चा करून येत्या एक-दोन दिवसांत जागावाटप अंतिम केले जाईल.

हेही वाचा >>>भांडुपमधील महापालिका रुग्णालयातील प्रसूती दिव्यांच्या प्रकाशातच, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

भाजपकडून नाराजांची मनधरणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात इच्छुकांच्या गाठीभेटी घेतल्या. काही नाराजांची त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतही तिन्ही पक्षांनी ठाम भूमिका घेतल्याने जागावाटपाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकाळी चर्चा केली. काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्याकरिता रविवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. तत्पूर्वी, शनिवारी राज्यातील नेत्यांच्या बैठकीत नावांची शिफारस केली जाईल.