बॉलिवूड अभिेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधातील कारवाईमुळे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. दरम्यान यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Aryan Khan Case: समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; पोलीस महासंचालकांची भेट घेत केली तक्रार

भाजपा नेते राम कदम यांनी वाझेप्रमाणे ड्रग्ज माफियांकडूनही वसुली सुरु आहे का? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. “समीर वानखेडे यांनी काही लोक पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. ते कुठे जात आहेत याची माहिती घेतली जात असून गुप्तहेरगिरी सुरु आहे. हे लोक कोण आहेत ही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेच पोलिसांचा गैरवापर करत पाळत ठेवली आहे. हे खरं आहे का? या प्रश्नाचं उत्तर तिन्ही पक्षांना द्यावं लागेल,” असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “संपूर्ण देश, महाराष्ट्र ड्रग्जच्या विरोधात आहे. जे अधिकारी ड्रग्ज माफियांविरोधात, ड्रग्जविरोधात कारवाई करत आहेत त्यांची मदत करायची सोडून हे तीन पक्ष त्यांच्यावर तुटून पडत आहेत. काय कारण आहे ? कोण लागतात हे ड्रग्ज माफिया तुमचे ? एनसीबीचे अधिकारी कोणावर कधी कारवाई कऱणार याची माहिती तीन पक्षांच्या सरकारला कशाला हवी आहे? यांचं वागणं संशय निर्माण करतं. पूर्वी वाझे वसुली करत होता तशी वसुली या माफियांकडूनही सुरु आहे का? याचं उत्तर महाराष्ट्रातीलल जनतेला हवं आहे.

महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का? – आशिष शेलार

आशिष शेलार यांनीदेखील टीका केली असून महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का? अशी विचारणा केली आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “तक्रारदारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे.. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या, माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलीस अजूनही मागावरच, आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलीसांकडून पाठलाग..महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का?”.

Story img Loader