BJP Gopal Shetty: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे उमेदवार गोपाळ शेट्टी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांचे मनधरणी करण्याचे काम असले तरी मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. तसेच गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागू शकतो, अशी शंका विरोधकांकडून वर्तविण्यात येत आहे. यावर आता स्वतः गोपाळ शेट्टी यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर भाष्य केले.
ईडीच्या चौकशीबाबत माध्यमांशी बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, माझ्या चौकशीबाबत मी याआधीच देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. २९ एप्रिल २०२४ रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून माझी चौकशी करा, अशी विनंती केली होती. तसेच २००७ साली मी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही पत्र लिहून माझ्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी विनंती केली होती. तसेच २०१३ सालीही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून माझी चौकशी करावी, अशी विनंती केली होती.
जर मी गुन्हेगार असेल तर माझी सर्व संपत्ती जप्त करावी. तसेच माझ्यावर कारवाई करावी, अशी मागणी मीच केली होती. विरोधकांचे कामच आहे संभ्रम निर्माण करणे. पण जर विरोधक माझ्याबाजूने बोलत असतील तर माझ्यासाठी ही चांगलीच बाब म्हणावी लागेल, असेही गोपाळ शेट्टी यावेळी म्हणाले.
हे वाचा >> Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
कोण आहेत गोपाळ शेट्टी?
गोपाळ शेट्टी २००९ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. २०१४ मध्ये त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने बोरीवली विधानसभेत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच, या मतदारसंघातून २०१९ ला सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर, आता २०२४ ला संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी नाराज झाले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd