राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याला विनयभंग म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला. यावर तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हेच शिकवलं जातं का? असा सवाल केला.
रिधा रशीद म्हणाल्या, “मी सुप्रिया सुळेंना विचारेन की, ज्या पद्धतीने माझ्याशी घटना घडली तीच परंपरा आहे का? ते असंच महिलांना ढकलून देत बाजूला लोटता का? त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंच होतं का? हेच शिकवलं जातं का? यावर महाराष्ट्र महिला आयोग काय भूमिका घेते हेही मला पाहायचं आहे. ते माझ्या बाजूने कधी भूमिका घेतात याची मी वाट पाहते आहे.”
“महिला आयोगाने कारवाई केली तर मला आवडेल”
“महिला आयोग महिलांसाठी आहे तर त्यांनी कारवाई केली तर मला आवडेल. त्यांनी स्वतः याची दखल घ्यायला हवी. बाकी मी स्वतः नक्की त्यांच्याकडे जाईल,” असं मत रिधा रशीद यांनी व्यक्त केलं.
“राजकारण मी करत नाही, मी धक्का दिलेला नाही”
“मुंब्र्यात माझी एक संस्था आहे आणि एक सामान्य व्यक्ती म्हणूनच मी काम करते. मला लोक भाजपा म्हणून कमी ओळखतात, माझी ओळख सामाजिक काम करते अशीच आहे. राजकारण मी करत नाही, मी धक्का दिलेला नाही,” असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला का?
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला का? या प्रश्नावर रिधा रशीद म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला नाही. घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगेचच निघून गेले. माझी त्यांच्याशी भेट झाली नाही.”