शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊतील फोटो शेअर केले. तसेच महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राऊतांनी बावनकुळेंचा फोटो शेअर केल्यानंतर भाजपाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर केला. तसेच खोचक प्रश्न विचारला.
भाजपाने म्हटलं, “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत तेथील हा परिसर आहे.”
“आदित्य ठाकरेंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे?”
“असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे?” असा प्रश्न भाजपाने संजय राऊतांना विचारला.
संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?
‘एक्स’ ( ट्वीटर ) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संजय राऊतांनी फोटोसह सलग तीन ट्वीट केले. त्यात ते म्हणाले, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”
“खेळले तर बिघडले कोठे?”
“१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”
“झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”
“ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,” असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.