रिपब्लिकन पक्षासाठी किती जागा सोडायच्या याबाबत महायुतीत भिजत घोंगडे कायम असून त्याबाबत रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून दसऱ्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र भाजप-शिवसेनेचा २६-२२चा जागावाटपाचा फॉम्र्युला मात्र कायम असल्याचे ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुंडे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षासाठी किती व कोणी जागा सोडायच्या किंवा काही जागांची अदलाबदल करायची, या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे मुंडे यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाने चार जागांची मागणी केली आहे. आपल्या पक्षाला जागा मिळाल्या नाहीत आणि लवकर जागावाटप केले नाही, तर युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पण आठवले परदेशात जात असल्याने त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये कायम राहील आणि जागावाटपाबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दलितांमध्ये मोदींच्या हिंदुत्वाचा नव्हे,विकासाचा प्रचार करावा लागेल -आठवले
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे त्या पक्षाच्या जागा वाढतील परंतु, अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत, परिणामी सत्ता हाती येणे थोडे कठीण वाटते, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेनेशी युती केलेल्या आरपीआयलाही दलित समाजात मोदींच्या हिंदुत्वाचा नव्हे, तर त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचा प्रचार करावा लागेल, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. आरपीआयचे त्यांना विकासाच्या प्रश्नावर समर्थन राहील, असे आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. खरे म्हणजे भाजपने मोदींना प्रचारप्रमुख म्हणून घोषित असताना पुन्हा त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला नको होते.  भाजपने मोदी यांच्या विकास कामांचा प्रचार करावा, हिंदुत्वाचा करु नये, असे आपले त्यांना आवाहन असल्याचे आठवले यांनी सांगितले. सत्ता परिवर्तनासाठी आम्ही शिवसेना-भाजपशी युती केली आहे, त्यामुळे महायुतीच्या किमान समान कार्यक्रमात दलित विकासाचा अजेंडा असावा असा आमचा आग्रह राहणार आहे.

Story img Loader