मुंबई : भाजप नेत्यासाठी नाही, तर पक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असून उमेदवार निवडीतही प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जाण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांनी दबावतंत्र वापरल्यास त्यांचा विचार करणार नसल्याची तंबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उमेदवार जाहीर होण्याची वाट न पाहता ३१ जानेवारीपर्यंत लोकसभा तर १४ फेब्रुवारीपर्यंत विधानसभानिहाय भाजपची निवडणूक कार्यालये सुरू करण्याचे आदेश सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी दिले आहेत.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारीसाठी कोणत्याही नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. निवडून येण्याची क्षमता व अन्य बाबी पाहून उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. फलकबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा कठोर इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि त्याआधी गुजरात व अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला. आमदारांना उमेदवारी नाकारली. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपद न देता नवीन चेहऱ्यांचा विचार झाला. त्याधर्तीवर लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी देण्याचे धोरण पक्ष राबविणार असल्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.
हेही वाचा – इंडिया – महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार कसा ?
हेही वाचा – काँग्रेस स्थापनादिनाच्या सभेची ऊर्जा लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का?
सर्वसामान्य जनतेला श्रीमंतीचे प्रदर्शन आवडत नाही, साधेपणा भावतो. त्यादृष्टीने साधी राहणी ठेवण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्याचा विचार उमेदवारी देतानाही होणार आहे. दोन-चार वेळा खासदार असलेल्यांनीही पक्षाला गृहीत धरू नये. भाजप पक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने महायुतीमध्ये काही जागा शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोडाव्या लागतील. त्यामुळे भाजपच्या काही इच्छुक नेत्यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेश पदाधिकारी व अन्य नेत्यांना तसे स्पष्ट संकेत दिले आहेत, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.