ठाणे महापालिकेतील हजारो कोटी रुपयांच्या अर्थकारणावर आपली पकड घट्ट व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी युती, आघाडय़ांचा मैत्री धर्म अक्षरश खुंटीवर टांगत सत्तेसाठी नवी राजकीय समीकरणे बांधण्यास सुरुवात केली असून शिवसेनेसोबत असलेली युती धाब्यावर बसवत भारतीय जनता पक्षाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यापुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडीकडून आलेली सभापतीपदाची ऑफर नाकारत अर्ज भरण्यास नकार देत कॉग्रेस, राष्ट्रवादीला धक्का दिला. शिवसेनेच्या ठाण्यातील तीन आमदारांनी यासाठी खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांना साकडे घातल्याने वृत्त असून मनसेचा एकमेव सदस्य तटस्थ राहिल्यास स्थायी समितीच्या चाव्या पुन्हा शिवसेनेकडे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
वर्षभरापुर्वी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी कॉग्रेसच्या पारडय़ात आपले मत टाकले होते. तसेच महापालिकेत स्थापन झालेल्या राष्ट्रवादीप्रणीत ६५ नगरसेवकांच्या आघाडीत मनसेचे सात नगरसेवक सहभागी आहेत. त्यामुळे यंदा सभापती पदासाठी मनसेने अर्ज भरावा, असे आघाडीच्या गोटात ठरले होते. मनसेचे सुधाकर चव्हाण त्यासाठी गुडघ्याला बाशींग बांधून तयारही होते. मात्र, ऐनवेळेस तुम्ही अर्ज भरु नका, असा आदेश चव्हाण यांना राजगडावरुन आला.महापालिकेचे अर्थकारण आपल्या ताब्यात रहावे यासाठी शिवसेनेने थेट राजगडावर गाऱ्हाणे मांडल्याची चर्चा असून चव्हाण तटस्थ राहिल्यास युतीचा विजय दृष्टीपथास आला आहे.
दरम्यान, चव्हाण यांच्या माघारीनंतर कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट भाजपला गळाला लावले असून या पक्षाचे सदस्य संजय वाघुले यांनी शिवसेनेला वाकुल्या दाखवत कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने युतीला मोठा हादरा बसला आहे. स्थायी समितीत युती आणि आघाडीकडे आठ-आठ असे संख्याबळ आहे. यामध्ये मनसे आणि भाजपचे प्रत्येकी एक सदस्य असून त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेने महापौर निवडणुकीत दिलेल्या शब्दानुसार बसपच्या विलास कांबळे यांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, शिवसेनेने आम्हाला दिलेला शब्द मोडल्यामुळे आम्ही स्वतंत्र्यपणे अर्ज दाखल केला, अशी माहिती भाजपचे उमेदवार वाघुले यांनी दिली.
वाघुले यांना रजिया शेख आणि गणेश साळवी या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सूचक, अनुमोदक म्हणून पाठींबा  दिला आहे. दरम्यान, वाघुले यांनी अर्ज भरताना आपणास कोणतीही कल्पना दिलेली नाही, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष मिलींद पाटणकर यांनी पत्रकारांना दिली. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे युती धर्म पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत चर्चा करुन आम्ही योग्य निर्णय घेऊ, असे पाटणकर यांनी स्पष्ट केले.  

Story img Loader