मुंबई : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीची खिल्ली उडविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळा किंवा राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारावरून राष्ट्रवादीवर आरोप केला. पण फडणवीस यांच्या कार्यकाळात सिंचन घोटाळय़ात जुजबी कारवाई करण्यात आली. तसेच सिंचन घोटाळय़ावरून भाजपने रान उठविले त्या अजित पवार यांच्याबरोबर फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी उरकून औट घटकेचे सरकार स्थापन केले होते. तसेच २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्याला भाजपची मूक संमती होती.
सिंचन घोटाळय़ावरून मोदी यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला असला तरी २०१४ ते २०१९ या फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तसेच फडणवीस यांच्या गेल्या वर्षभरातील गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात तपासात कितपत प्रगती झाली हा संशोधनाचा विषय ठरावा. सिंचन घोटाळय़ावरून अजित पवार यांच्यावर आरोप झाले होते. काही अधिकाऱ्यांना अटक झाली, पण कोणत्याही राजकारण्याच्या विरोधात कारवाई झाली नाही.
२०१४मध्ये विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापण्याकरिता भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तेव्हा भाजप स्वबळावर लढला होता व पक्षाला १२२ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या घोषणेवर भाजपने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. यामुळे भाजपची तेव्हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला मूक संमती होती.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांना सोबत घेऊनच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औटघटकेचे सरकार सत्तेत आले होते. पहाटेचा शपथविधी तेव्हा गाजला होता. अजितदादांनी फडणवीस यांना साथ दिल्याबरोबरच लगेचच अमरावती विभागतील सिंचन घोटाळय़ाची चौकशी थांबविण्याचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काढला होता. फडणवीस यांना मदत केल्यानेच अजितदादांना दिलासा दिल्याची तेव्हा टीकाही झाली होती.
भाजपने सत्तेत असताना सिंचन घोटाळय़ाची चौकशी पूर्णत्वास नेली नव्हती. तेव्हा राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची भाजपला संधी होती. पण चौकशीचा घोळ घालण्यात आला. तेव्हा काही कारवाई केली नाही आता मोदी सिंचन घोटाळय़ावरून राष्ट्रवादीला दूषणे देत आहेत.
शिखर बँकेकडून कर्ज घेतले नाही – शरद पवार
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले. मी कधीच शिखर बँकेचा सभासद नव्हतो. शिखर बँकेकडून मी कधी कर्ज घेतले नाही. मोदींनी केलेल्या वक्तव्याबाबत विचार करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात. ते देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात. या गोष्टी काहींना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जातात, अशी टीकाही त्यांनी केली. दी पूना मर्चंट्स चेंबरकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.