सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विरोधकांकडून यासाठी आंदोलन देखील केलं गेलं. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून हा निर्णय लागू असणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाब्दीक चिमटा काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे घरातून काम करणारे मुख्यमंत्री आहेत म्हणत भाजपा नेते सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान, दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? असा प्रश्न भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला आहे. 

दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार” असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

लोकलबाबतच्या निर्णयावरून भाजपानं मुख्यमंत्र्यांना सुनावलं!

काल देखील केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी नमलं अशी, टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असा निशाणा त्यांनी साधला होता.

“सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!”, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokesperson keshav upadhyay criticizes chief minister uddhav thackeray srk
Show comments