BJP Spokesperson Joins Shivsena: विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली असतानाच जागावाटप व उमेदवारांची आकडेवारी जाहीर केली जात आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांना, काही ठिकाणी नवोदितांना तर काही ठिकाणी इतर पक्षातून आयात उमेदवारांना उमेदवारी दिली जात आहे. मुंबईतल्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातही शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने अशाच प्रकारे उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या पक्षातून उमेदवाराचा पक्षात प्रवेश होण्याआधीच त्याच्या नावाचा समावेश पक्षाच्या उमेदवार यादीमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे पडद्यामागच्या राजकीय घडामोडी कमालीच्या वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षानं सोमवारी रात्री उशीरा आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. एकीकडे अद्याप महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नसताना दुसरीकडे एकामागोमाग उमेदवार याद्या मात्र जाहीर केल्या जात आहेत. यातच सोमवारी जाहीर केलेल्या यादीमधील एका नावामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं.
भाजपाच्या प्रवक्त्यांचा शिवसेनेच्या यादीत समावेश!
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षानं सोमवारी १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये चक्क भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. शायना एनसी यांना पक्षानं मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून शायना एनसी या वरळी मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. वरळीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं आदित्य ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. मात्र, जागावाटपात वरळी मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वाट्याला आल्यामुळे तिथून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर झाली.
दुसरीकडे मुंबादेवी हा मतदारसंघदेखील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्याच यादीत समाविष्ट आहे. मिलिंद देवरांच्या उमेदवारीमुळे शायना एनसी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला. शेवटी सोमवारी रात्री शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची यादी जाहीर झाल्यानंतर हा संभ्रम दूर झाला. रात्री उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर आज दुपारी दीडच्या सुमारास शायना एनसी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. आता त्या पक्षाच्या मुंबादेवीमधून अधिकृत उमेदवार असतील.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच, “आपल्या माहायुतीनं मला मुंबादेवीच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.