मुंबई : बिहारमधील ओबीसी जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यावर राज्यातही ही मागणी जोर धरू लागली असतानाच, बिहारच्या धर्तीवर राज्यातही इतर मागासवर्ग समाजाची (ओबीसी) जनगणना (डेटा) करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली. यावर राज्यातही ओबीसींची जनगणना करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बिहार सरकारने सोमवारी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. राज्यातही अशी जनगणना करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय नेते तसेच ओबीसी समाजाच्या संघटनांकडून करण्यात आली आहे. बिहारमध्ये सर्व समाजाची माहिती (डेटा) जमा करण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेबाबत आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर मौन बाळगले आहे. पण ओबीसी जनगणनेसाठी दबाव वाढू लागताच बावनकुळे यांनी ही मागणी सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा>>>मुंबई: आरोग्य सेविकांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे : शरद पवार
पिंपरी : कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळय़ात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
बिहारला जमते ते महाराष्ट्राला का जमत नाही ? भुजबळांचा सवाल
जातनिहाय जनगणनेचे काम बिहार सरकारने सहा महिन्यांत पूर्ण केले. मग हेच काम महाराष्ट्राला का जमू शकणार नाही, असा सवाल ओबीसी समाजाचे नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. बिहारमधील जनगणनेमुळे ओबीसी व अन्य समाज घटकांची आकडेवारी समोर आली. राज्यातही अशीच आकडेवारी जाहीर व्हावी, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने त्वरित जातनिहाय जनगणना करण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे.
हेही वाचा>>>एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्याना वर्षभरानंतरही नियुक्तीपत्र नाही; आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण
जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा : वडेट्टीवार
राज्यातील विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एकमेव उपाय आहे. बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. एकाबाजूला ओबीसी यात्रा काढायची आणि जातनिहाय जनगणनेला विरोध करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.