भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर; पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असे प्रत्युत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत. अन्यथा न्यायालयात जावे, असे आव्हान दिले.
फार मोठे प्रकरण बाहेर काढणार, अशी वातावरण निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेले काही दिवस केली होती. पण राऊत यांचे आरोप म्हणजे ‘ डोंगर पोखरुन उंदीर निघाला, ’ असा टोला पाटील यांनी लगावला. नुसते आरोप केल्याने काहीच होत नाही. एखादा माणूस अडचणीत आल्यावर कसा थयथयाट करतो, असे राऊत यांचे वर्तन दिसल्याचा चिमटाही पाटील यांनी काढला.
मुलीच्या विवाह सोहळय़ात साडेनऊ कोटींचा गालिचा अंथरला होता या राऊत यांचा आरोपाचा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इन्कार केला. संजय राऊत यांच्या आरोपांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. माझ्या मुलीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्याबाबत दोन वेळा चौकशीही झाली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. सरकारमधील नेत्यांनी भाजप नेत्यांवर आतापर्यंत अनेक आरोप केले. जलयुक्त शिवार, वृक्षलागवड योजनांची चौकशी करण्याची घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले.? आम्ही कधीही चौकशीला विरोध केला नाही. सरकारचा पैसा जनतेचा आहे आणि कोणीही गैरव्यवहार केला असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
किरीट सोमय्यांचे आव्हान
संजय राऊत संपादक असलेल्या ‘ सामना ’ दैनिकातून २०१७ मध्ये माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप करण्यात आले होते. त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन आज माझ्या मुलावर आरोप करण्यात आले. त्याबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी , असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. राज्य सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत, आणखी ३ दाखल होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट व चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
नोटीस पाठविणार – कंबोज
खासदार राऊत यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. राऊत यांनी मानहानीकारक आरोप केल्याने त्यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.मी कंबोजला ओळखत नाही, असे राऊत यांनी सांगितले. परंतु दरवर्षी गणपतीसाठी राऊत माझ्या घरी आले आहेत. त्यांना गरजेच्या वेळी मी अनेकदा अर्थिक मदतही केली आहे. राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. पत्राचाळीची जागा माझ्या कंपनीने खरेदी केली होती. त्यात माझे पैसे बुडाले. त्याबद्दल मी तक्रार दाखल केली आहे. त्या जागेचा आजवर पुनर्विकास झालेला नाही. ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत यांनी पैसा आणि सत्ता याचा वापर करीत वसईतील जागा मुंबईतील एका विकासकाला दिली आहे हे सारे राऊतांच्या आशीर्वादाने झाले आहे, असा आरोपही कंबोज यांनी केला.