काँग्रेस आघाडीसोबत सातत्याने लगट करत असल्याच्या आरोपावरून शिवसेना नगरसेवकांच्या टीकेचे धनी ठरलेले ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षानेही निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सभागृहात विकास कामांचे प्रस्ताव आणताना नियमांना धाब्यावर बसविले जात असल्याचा आक्षेप उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी घेतल्याने ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीमधील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचा एक मोठा गट महापौर पाटील यांच्यावर नाराज आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपनेही महापौरांविरोधात आघाडी उघडल्याचे चित्र दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, कोपरी परिसरात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचे भवितव्य शिवसेनेच्या मदतीवर अवलंबून असताना महापालिकेत या दोन्ही पक्षात सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे शिवसेनेचे सर्वेसर्वा आमदार एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे काँग्रेस नगरसेवकांसोबत चांगले सूर जुळतात, असा काही ज्येष्ठ शिवसेना नगरसेवकांचा आक्षेप आहे.
या पाश्र्वभूमीवर भाजपचे उपमहापौर मिलींद पाटणकर यांनीही सर्वसाधारण सभेच्या आयोजनाविषयी काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे महापालिका वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी सूर दिसून आले आहेत.

Story img Loader