उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्वबळ’ दाखवता यावे, यासाठी भाजप नेते त्यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या दसरा मेळाव्यापासून दूर राहणार आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे यांचा पहिलाच मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होत असून, त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्यभरातून चार हजारांहून अधिक बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांमधून पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत. प्रत्येक आमदार-खासदार, जिल्हाप्रमुख आदींना किमान किती कार्यकर्ते आणायचे, हे ठरवून देण्यात आले आहे.

शिंदे गटातील आमदार आणि खासदार हे आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणार असल्याचे संकेत आहेत. गद्दार, पन्नास खोके आदी मुद्दय़ांना जसाश तसे उत्तर देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नेते मेळाव्यास गेल्यास त्यांना भाषणाची संधी द्यावी लागेल. प्रसारमाध्यमांमध्ये फडणवीस यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले जाईल. त्यामुळे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटातील वरिष्ठ नेतेच राहावेत, असा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे, फडणवीस आणि अन्य भाजप नेते मेळाव्यास गेल्यास भाजप कार्यकर्तेही तिथे गर्दी करतील. त्यातून शिंदे गटाने भाजप नेत्यांची कुमक घेऊन गर्दी जमविल्याची टीका होईल. ती टाळण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री बनल्यानंतरचा शिंदे यांचा हा पहिलाच मेळावा असल्याने आणि युती सरकार असल्याने भाजप नेत्यांनी त्यात उपस्थित राहावे, असाही एक मतप्रवाह दोन्ही पक्षांमध्ये आहे. पण, शिंदे यांनी ‘स्वबळा’द्वारे मेळावा यशस्वी केला, असे दाखवून द्यायचे असल्याने उपस्थित न राहण्याची भूमिका ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सध्या घेतली आहे. ‘‘हा मेळावा त्यांच्या पक्षाचा असून, अद्याप आम्हाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यास उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही’’ असे ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी किंवा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दोन दिवसांत चर्चा झाल्यास भूमिकेत बदल होऊ शकतो, पण तशी शक्यता कमी असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले.

तेव्हा भाजप नेत्यांची उपस्थिती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी काही वेळा उपस्थित राहिले होते. मात्र, भाजप-शिवसेना यांच्यातील तणावामुळे नंतर ही परंपरा हळूहळू खंडित झाली.

Story img Loader