मुंबई : नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कोणाकडे दिले जाणार नाही, असा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसल्याने हा तिढा सुटू शकलेला नाही. पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाने या दोन्ही नियुक्त्यांना आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील उच्चपदस्थांकडे तक्रार केल्यावर २४ तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. १९ जानेवारीला स्थगिती देण्यात आल्यापासून महिनाभरापेक्षा अधिक काळ यावर तोडगा काढण्याचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रयत्न सुरू आहेत. या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.

बैठकीला महाजन उपस्थित

राष्ट्रवादीने नाशिकचे पालकमंत्रीपद मिळणार नसल्यास रायगडचे पालकमंत्रीपद कायम राहावे, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार हे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाले. या बैठकीला मंत्र्यांपैकी फक्त गिरीश महाजन उपस्थित होते.

तडजोडीसाठी प्रयत्न

रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटाचे भरत गोगावले अडून बसले आहेत. पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही तयारी नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार असतानाही पालकमंत्रीपदावरचा दावा आम्ही मागे घेतल्याने रायगडचे पालकमंत्रीपद आमच्याकडे कायम राहावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे पालकमंत्रीपद सोडण्यास एकनाथ शिंदे यांची अजिबात तयारी नाही. यावर तोडगा म्हणून गोगावले वा तटकरे या दोघांऐवजी तिसऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.