मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वबळावर लढण्याची ‘कृष्णनिती’
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून भाजपाने शिवसेनेवर टीका न करण्याचे धोरण अवलंबिले असून यामागे योग्य वेळी स्वबळावर लढून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याची ‘कृष्णनिती’ आहे. महापालिका निवडणुकीत शेवटपर्यंत एकत्रित लढण्याची भूमिका घेऊन शेवटच्या टप्प्यात स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा फायदा भाजपाल जास्त होऊ शकतो असे भाजपच्या नेत्यांना सर्वेक्षणात दिसून आले. त्यामुळेच शिवसेनेवर टीका करण्याऐवजी त्यांच्याशी जुळवून घेण्याचे व दोन्ही पक्षांतून कमीतकमी टीका कशी होईल, याची काळजी घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपापासून वेगवेगळ्या मुद्दय़ांवर भाजपावर टिकेचे आसूड ओढण्याचे काम शिवसेना नेते करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उद्धव यांच्यावर थेट टीका चालवली होती. मध्यमंतरी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी उद्धव यांच्या उल्लेख ‘असरानी’ असा केल्यामुळे शिवसेनेने भाजपवरील टीकेची धार वाढवली. यातून दोन्ही पक्षांमध्ये दूरावा निर्माण होऊन ‘सत्ता कधी सोडायची ते आम्हाला कळते’ असा टोला शिवसेना नेतृत्वाने लगावला. शेलार यांनी तर शिवसेनेचा राक्षस बाटलीत बंद करण्याची भाषा केल्यानंतर हा वाढता दूरावा दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाच थेट पुढाकार घ्यावा लागला. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे लोकांची कामे होत नाहीत तर दुसरीकडे भाजपमंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत येत असताना शिवसेनेची त्याला साथ मिळाल्यास त्याचा त्रास भाजपलाच होणार हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्याबरोबर ‘डिनर डिप्लोमसी’ केली. निवडणुकीला अजूनही वेळ असून भाजपची नेमकी ताकद किती याचीही अद्यापि ठोस अंदाज आलेला नसताना केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये यश मिळाले म्हणून मुंबईत तसेच मिळेल हे मानणे भाबडेपणाचे असल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात आले.
मुंबईत भाजपचे १५ आमदार तर शिवसेनेचे १४ आमदार आहेत. पालिकेच्या २२७ प्रभागांपैकी १६० प्रभागांमध्ये भाजपसध्या आघाडीवर असून किमान शंभर जागा मिळाल्यास युती करता येईल, अशी भाजपची भूमिका आहे तर शंभर जाग देणे हे शिवसेनेला शक्य होणार नाही. त्यातही आरक्षणामुळे जागांची करावी लागणारी आदलाबदल आणि रिपब्लिकन पक्षाला द्याव्या लागणाऱ्या जागा हा दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखीचा विषय ठरणार असून आतापासूनच एकमेकांवर चिखलफेक केल्यास त्याचा लाभ अन्य पक्षांना मिळेल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीका टाळण्याचा निर्णय घेतला आहे. अजून सहा महिने शिवसेनेला अंगावर न घेता मुंबई व ठाण्यात भाजपची ताकद वाढवून जागावाटपात समाधानपूर्ण मार्ग न निघाल्यास स्वतंत्रपणे लढून शिवसेनेसा ‘कात्रजचा घाट’ दाखविण्याची कृष्णनिती भाजपाने निश्चित केली आहे.