मुंबई : राज्यात भाजपला ५१ टक्के मतांची खात्री होईल तेव्हाच शत-प्रतिशतचा नारा प्रत्यक्षात अमलात आणणे शक्य होईल. सध्या तरी युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळणार हे निश्चित असले तरी राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील आणि त्यात भाजप मोठ्या भावाची भूमिका बजावेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात गुरुवारी स्पष्ट केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट, महायुतीतील समन्वय, शरद पवारांचे राजकारण, अजित पवारांच्या समावेशानंतर पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची काढावी लागलेली समजूत, महाविकास आघाडीचे आव्हान, भविष्यात मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, जागावाटपात ठाणे मतदारसंघाचा धरलेला आग्रह अशा विविध मुद्द्यांवर फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये मनमोकळेपणे आपली भूमिका मांडली.
हेही वाचा >>> इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे; तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी
गेल्या वेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल, अशी उगाचच चर्चा केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष महायुती म्हणूनच एकत्रित लढू अशी ग्वाही देतो. भाजपच्या शत-प्रतिशत नाऱ्याचे काय झाले या प्रश्नावर, जेव्हा केव्हा आम्हाला ५१ टक्के मते मिळण्याची खात्री होईल तेव्हाच आम्ही तसा विचार करू. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जागावाटपात लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अ़डचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही. आताही भाजपचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात तीन पक्षांची महायुती किंवा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे काहीसा गोंधळ झाला. पण मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून द्यायचे हा जनतेने निर्धार केला असल्याने महायुतीला चांगलेच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांना शह देण्यासाठीच…
अजित पवार यांना बरोबर घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते व कार्यकर्ते सुरुवातीला नाराज झाले होते. पण त्यांची महिनाभरात समजूत काढण्यात यश आले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असे पुरेसे संख्याबळ असताना अजित पवारांची आवश्यकता का भासली, या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी विरोधकांची मोट बांधून भाजपला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अशा वेळी आम्हालाही रणनीती आखावी लागली. राष्ट्रवादीत आपल्याला काही भवितव्य नाही याची अजित पवारांची खात्री झाली होती. आम्हालाही ताकद वाढवायची होती. त्यातूनच अजित पवार आमच्याबरोबर आले. शेवटी आम्हालाही राजकारण करायचे आहे. अजित पवार बरोबर आल्याने पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद वाढली, असे फडणवीस यांनी सांगितले. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर भाजपने आरोप केले होते हे अगदी बरोबर. पण यंत्रणांना त्यांचा थेट सहभाग कुठे आढळला नव्हता, असा दावा फडणवीस यांनी केला.
शेवटी मतांचे गणित महत्त्वाचे
राजकारणात रासायनिक समीकरण (पॉलिटिकल केमिस्ट्री) तसेच मतांचे गणित (अॅरेथमॅटिक्स) महत्त्वाचे असते. आम्ही रसायनांत मजबूत होतो पण गणिताची खात्री नव्हती. म्हणूनच मतांचे गणित जुळविण्यासाठी पक्षाची ताकद वाढवावी लागते. मग नवीन मित्र जोडावे लागतात. याचाच भाग म्हणून अजित पवार किंवा राज ठाकरे यांच्याशी आम्ही मैत्री केली. याचा आम्हाला निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.