आशीष शेलार यांचे प्रतिपादन;आदित्य ठाकरेंना अस्सल मुंबईकरांची जाण नसल्याची टीका
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत १३४हून अधिक जागा स्वबळावर जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सोमवारी ‘इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंज’मध्ये केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे अस्सल मुंबईकर नाहीत, ‘पब, पार्टी आणि पेग कल्चर (पेज थ्री)’ हेच त्यांना समजते. शिवसेना भाजपबरोबर २५ वर्षे युतीत राहिल्यानेच महापालिकेतही सत्तेवर राहिली, असा दावाही शेलार यांनी केला.
मुंबई महापालिकेची स्थापना १८८८ मध्ये झाली असून त्यास १३४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ‘ मुंबई महापालिका १३४, भाजप १३४हून अधिक जागा’ अशी रणनीती ठरवून भाजपने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना पराजयाची भीती वाटत असल्याने महापालिकेची प्रभाग रचना बदलण्यात आली आहे, असे सांगून शेलार म्हणाले, शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांच्या प्रभागांची रचना कायम असून भाजपच्या बऱ्याचशा नगरसेवकांच्या किंवा भाजपचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पण भाजपची मतदान केंद्रनिहाय (बूथ) पक्षबांधणी मजबूत असल्याने आमची लढण्याची तयारी आहे.
मनसेशी युती नाही
मनसेसह कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही किंवा तशी चर्चाही झालेली नाही. महाविकास आघाडी स्थापन केल्याने मराठी माणूस चिडलेला असून निवडणुकीत तो शिवसेनेबद्दलचा रोष प्रकट करून भाजपबरोबर येईल.
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक लढविणार आहे. या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले, आदित्य ठाकरे हे अजून मुंबईच्या सर्व भागांत गेलेही नाहीत. सर्वसामान्य आणि अस्सल मुंबईकरांच्या प्रश्नांची त्यांना काय जाण आहे? ते कधी बॉक्स क्रिकेट खेळले आहेत का, मुंबईतील विविध उत्सव, गणेशोत्सवात सहभागी झाले होते का? मुंबईकराचे वडापावशी नाते असून ते कधी तो खातात का? उपनगरी लोकल गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्यांचे, बालमोहन किंवा अन्य शाळांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत का, असे सवाल शेलार यांनी केले.
जुन्या नेत्यांची शिवसेना आणि तरुणांची युवा सेना यांच्यात मोठी दरी असून अनिल परब, अनिल देसाई यांच्यासारख्या नेत्यांना दूर ठेवून आदित्य ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर निवडणुकीची तयारी करीत आहेत, असे शेलार यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध आणि आपला स्वार्थ साधणे, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे उद्दिष्ट असल्याने ते एकत्र राहतील. पण त्यांच्यातील मतभेद आता उघडपणे दिसून येत असल्याचे शेलार यांनी सांगितले. शिवसेनेने मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्यास विरोध केला, पण वर्षभरात शेकडो झाडे मुंबईत कापली गेली. आरेमध्ये परिवहन विभागाचे (आरटीओ) केंद्र चालते, पण मेट्रो कारशेड नको. केवळ बंगलेधारक किंवा श्रीमंत नागरिक वगळून मुंबईकरांना सरसकट ५०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी द्यावी, अधिक क्षेत्रफळांच्या सदनिका असल्या तरीही या निर्णयाचा लाभ द्यावा अशी भाजपची भूमिका आहे, असे शेलार यांनी स्पष्ट केले.