मुंबई : अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली. यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, अन्य सात उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्यक्ष पोटनिवडणूक होणार आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजपचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली. या पोटनिवडणुकीत १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होईल.

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबियांतील कोणी लढत असल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करून राज्यातील उज्ज्वल परंपरेचे पालन करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली होती. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या सूचनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे नमूद करत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. लटके यांना लढत देईल, असा तुल्यबळ उमेदवार शिंदे गटाकडे नसल्याने भाजपने ही जागा आपल्याकडे घेतली. पण, भाजपकडेही मुरजी पटेल यांच्याव्यतिरिक्त अन्य उमेदवार नव्हता. पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद गेले. पटेल हे वादग्रस्त उमेदवार असल्याने आणि काँग्रेस आणि शिवसेनेतून त्यांचा भाजपकडे प्रवास झाल्याने स्थानिक भाजप कार्यकर्तेही नाराज होते. पटेल हे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे विश्वासू असून, त्यांच्यामुळे पटेल यांना उमेदवारी मिळाली होती. अन्य काही नेते पटेल यांना उमेदवारी देण्यास अनुकूल नव्हते. पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यास शेलार यांनी फडणवीस आणि अन्य नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत तीव्र विरोध केला. पराभवाच्या भीतीने युतीने उमेदवार मागे घेतला, असा प्रचार होईल आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मनोधैर्यावर परिणाम होईल, टीकेला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका शेलार यांनी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडली. पण, राज्याची संस्कृती व दिवंगत आमदारांच्या कुटुंबियांपैकी कोणी निवडणूक लढवीत असल्यास ती बिनविरोध व्हावी, या भूमिकेस पाठिंबा देत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.

पटेल यांनी काही महिन्यांपासून प्रचार सुरू करून जोरदार मिरवणूक काढून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, पटेल यांनी उमेदवारी मागे घेऊन लगेच शेलार यांची भेट घेतली आणि पक्षादेशाचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार :

ऋतुजा लटके – शिवसेना,

बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स)

मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी

निना खेडेकर – अपक्ष

फरहान सय्यद – अपक्ष

मिलिंद कांबळे – अपक्ष

राजेश त्रिपाठी – अपक्ष

ठाकरे गटाकडून स्वागत, पण..

शिवसेना नेते अँड. अनिल परब यांनी भाजपच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

दोन मतप्रवाह

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह काही नेत्यांचा माघारीला विरोध होता. माघारीबाबत पक्षात गेले दोन दिवस खल सुरू होता. राज ठाकरे यांच्या पत्रावरून माघार का घ्यावी, असा प्रश्नही पक्षात उपस्थित झाला होता. मात्र, दिल्लीतील नेतृत्वाशी सल्लामसलत झाल्यावर भाजप उमेदवार पटेल यांच्या माघारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जिंकण्याची खात्री होती. मात्र, राज्याची प्रथा-परंपरा पाळण्यासाठी मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते, उपमुख्यमंत्री

Story img Loader