मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला साध्या बहुमतापासून रोखण्यात विरोधक यशस्वी झाले असले तरी त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये जिंकून भाजपने आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. याउलट झारखंड वगळता काँग्रेसची सर्वत्र पिछेहाटच झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत भाजपची ‘चारशे पार’ची घोषणा प्रत्यक्षात येऊ शकली नाही. काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपला २७२चा जादुई आकडा गाठू दिला नव्हता. भाजपची गाडी २४० वरच अडकली. इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. काँग्रेसची कामगिरी सुधारली व पक्षाला ९९ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस व विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. भाजपची पिछेहाट सुरू होईल, असे चित्र निर्माण केले गेले. पण लोकसभेनंतर गेल्या आठ महिन्यांत झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल लक्षात घेतल्यास भाजपने विरोधकांवर मात केली आहे.

दिल्लीमध्ये जवळपास तीन दशकाने सत्ता मिळवून भाजपने दिल्लीतही ताकद दाखवून दिली. भाजप आणि आम आदमी पार्टीच्या मतांमध्ये केवळ दोन टक्क्यांच्या फरक असला तरी ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने निर्विवाद यश मिळविले.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर भाजपने सावध होत पावले टाकली. त्यातूनच तीन राज्यांची निवडणूक जिंकली. याउलट काँग्रेसची वर्षभरात घसरणच झालेली दिसते. जम्मू आणि काश्मीमध्ये पक्षाला यशाची अपेक्षा होती. भाजपच्या आक्रमकपणापुढे काँग्रेसचा टिकाव लागला नाही.

जातीय राजकारणाचा भाजपला लाभ

● जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपला सत्ता मिळाली नसली तरी जम्मू भागातील २९ जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले.

● झारखंडमध्ये सत्तेची येण्याचे भाजपचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडिया आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला.

● हरियाणामध्ये भाजपचा पराभव निश्चित मानला जात होता. पक्षाचे नेतेही विजयाबाबत साशंक होते. पण काँग्रेसमधील गटबाजी तसेच जातीच्या राजकारणाचा भाजपला फायदा झाला.

● हरियाणामध्ये विरोधी वातावरण असतानाही बिगर जाट मतांच्या ध्रुवीकरणाने भाजपला पुन्हा सत्ता मिळाली.

● महाराष्ट्रात महायुतीने २३७ जागा जिंकून विक्रमी यश मिळविले. भाजपचे १३२ आमदार निवड़ून आले. भाजपची शत प्रतिशतच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

मित्र पक्षांना साथ नकोशी

दिल्लीत तर २०१५ आणि २०२० पाठोपाठ यंदाही काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. विरोधक एकत्र राहिले तरच भाजपला आव्हान देऊ शकतात. हे लोकसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. आता तर काँग्रेसची साथ मित्र पक्षांना नकोशी झाली आहे.

गटबाजीचा पक्षाला फटका

हरियाणामध्ये काँग्रेसने ९० पैकी ७२ जागांवर आपल्या मर्जीतील उमेदवार उभे केले. शैलजा यांच्यासह अन्य नेते यातून नाराज झाले. जाट समाजाला काँग्रेसने प्राधान्य दिल्याने अन्य समाज घटक भाजपच्या मागे गेले. परिणामी जातीच्या ध्रुवीकरणातून काँग्रेसला मोठा फटका बसला. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये हेवेदावे सुरू झाले. अंतर्गत गटबाजीचा पक्षाला मोठा फटका बसला. राज्याच्या इतिहासात सर्वात कमी म्हणजे केवळ १६ आमदार काँग्रेसचे निवडून आले.