निवडणुकीसाठी पूर्वी फार खर्च येत नसे. सुमारे २० वर्षांपूर्वी २२ हजार रुपये खर्च करून निवडून आलो, पण गेल्यावेळी आठ कोटी रुपये खर्च करावे लागले, अशी कबूली भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काल (गुरूवार) दिली. भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुखपद मिळाल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी गुरूवारी प्रथमच मुंबईत आले होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते.
निवडणुकीत पैशांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो, हे सांगताना मुंडे यांनी आपण गेल्या निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाचे कोणी ऐकत नाही ना, असे विचारत आता निवडणुकीला फक्त सहा महिने राहिले आहेत, काही फरक पडत नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. मुंबई शेअर बाजारातील सभागृहात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक विनय सहस्त्रबुध्दे यांच्या ‘बियॉंड ए बिलियन बॅलट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झाले. सुराज्य व सुप्रशासन या विषयावर मोदी यांनी तासभर बौध्दिक घेतले. ‘समाजातील आर्थिक विषमता, गरीब-श्रीमंत भेदभाव नष्ट करणे, जनतेमध्ये बंधुभाव निर्माण करून सुशासनाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे, हेच रामराज्य आहे,’असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.  मात्र, मोदी सुराज्याची संकल्पना मांडत असताना त्याच व्यासपीठावरून मुंडेंनी केलेल्या विधानामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारा भाजप मुंडेंच्या निवडणुकीतील कोटीच्या कोटी उड्डानांच्या जाहीर कबुलीमुळे गोत्यात येऊ शकतो. निवडणुकांच्या तोंडावर कायदेशीरदृष्ट्या मुंडेंना कसलीच अडचण येणार नसली तरी हाच मुद्दा घेऊन विरोधक त्यांना कात्रीत पकडू शकतात. याआधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणुकीत जाहीरातबाजीवर खर्च केल्याच्या कारणाहून अडचणीत आले होते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता मुंडेंच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेस भाजपला अडचणीत आणेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा