विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून, त्यावेळी रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घटक पक्षाच्या नेत्यांना दिले.
विधानसभा निवडणुकीत चार घटक पक्षांनी भाजपला साथ दिली होती. त्याबदल्यात रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद व त्यांच्या पक्षासह अन्य घटक पक्षांना सत्तेत वाटा देण्याचे भाजपने मान्य केले होते. परंतु आठवले यांना अद्याप केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही आणि राज्यातही घटक पक्षांना सत्तेपासून दूरच ठेवण्यात आले. मधल्या काळात शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रासपचे महादेव जानकर यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली.
निवडणुकीत आश्वासन देऊन सत्तेत सहभाग दिला जात नसल्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजी आहे. याबद्दलची रणनीती ठरविण्यासाठी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीला खासदार राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, अविनाश महातेकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते. भाजप जर अशा प्रकारे सत्तेत सहभागी करून घेण्यास टाळाटाळ करीत असेल तर, चार घटक पक्षांनी वेगळा विचार करावा, असा सूर बैठकीत लावण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनाही घटक पक्षाच्या नाराजीची दखल घ्यावी लागली. त्यांनी लगेच वर्षांवर चार पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेतले. आठवले बैठकीला गेले नाहीत. मात्र इतर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत, पावसाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांच्या नेत्यांचा मंत्री म्हणून समावेश केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे अविनाश महातेकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा