मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा २ अ टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा असून ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण टप्पा २ अ च्या निरीक्षणासाठी अखेर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.
आता या पथकाकडून बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या मार्गिकेचे निरीक्षण करून या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच टप्पा २ अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत ही संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे या मार्गिकेस विलंब झाला आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२४ रोजी या मार्गिकेतील आरे-बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या टप्प्याला अद्यापही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रतिसाद वाढेल, असा विश्वास एमएमआरसीला आहे. त्यामुळेच बीकेसी-कफ परेड मार्गिकेच्या कामाला एमएमआरसीकडून वेग देण्यात आला आहे. या वर्षातच ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.
आरेआचार्य अत्रे चौक, वरळी थेट भुयारी मेट्रो प्रवास
सीएमआरएसच्या पथकाने टप्पा २ अ चे निरीक्षण पूर्ण केल्यानंतर सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र जारी केले जाईल. हे प्रमाणपत्र मिळताच एमएमआरसीकडून बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्प्याचे लोकार्पण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून थेट वरळीला, आचार्य अत्रे चौकापर्यंत पोहचणे सोपे होणार आहे.