मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील बीकेसी- कुलाबा टप्पा मार्गिकेचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा २ अ’ मार्चअखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे. त्यानुसार ‘टप्पा २ अ’च्या कामालाही वेग देण्यात आला आहे. यातील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच ‘टप्पा २ अ’चे स्थापत्य आणि प्रणालीचे काम पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल.

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचे काम ‘एमएमआरसी’ करीत आहे. ३३.५ किमीच्या या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे-बीकेसी असा अंदाजे १२ किमीचा टप्पा ऑक्टोबर २०२४मध्ये सुरू झाला. या मार्गिकेला अद्याप प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी आरे-कुलाबा असा संपूर्ण मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रतिसाद वाढेल. त्यामुळे आता बीकेसी-कुलाबा टप्प्याच्या कामाला वेग देत शक्य तितक्या लवकर संपूर्ण, आरे-कुलाबा ‘मेट्रो ३’ मार्गिका संचालनाचे नियोजन आहे. राज्य सरकारने बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा १०० दिवसांत कार्यान्वित करा, असे निर्देश काही दिवसांपूर्वी ‘एमएमआरसी’ला दिले आहेत.

बीकेसी-कुलाबा मार्गिकेचे एकूण ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी-कुलाबा मार्गिकेतील बीकेसी-वरळी ‘टप्पा २ अ’ मार्गिकेतील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण झाले आहे. बीकेसी – वरळी टप्पा २ अ मधील प्रणालीच्या (सिस्टिम) कामाला वेग देण्यात आला आहे. त्यानुसार प्रणालीचे काम ८५.८ टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. मार्चअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून बीकेसी – वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader