मुंबई : हिरे व्यापाऱ्याची दीड कोटी रुपयांचे हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरोधात वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघेही दलाल असून त्यांनी इतर व्यापाऱ्यांचीही अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याप्रकरणातील तक्रारदार संदीप भदानी हे हिरे व्यापारी असून बीकेसी डायमंड पार्क येथे त्यांचे कार्यालय आहे. मिरा रोड येथील राहणारा एक दलाल त्यांच्या परिचयाचा होता. हा दलाल गेल्या चारवर्षांपासून हिरे विक्री करत असल्यामुळे भदानी यांचा त्याच्यावर विश्वास होता. गेल्यावर्षी १ मे रोजी त्याने एका व्यावसायिकाला देण्यासाठी एकूण ३७ लाख ८६ हजार ८१६ रुपये किंमतीचे हिरे नेले.
पण, ठरलेल्या वेळेत त्यांनी पैसे पोच केले नाहीत. त्यानंतर त्याने संबंधीत व्यावसायिकाला आणखी हिऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने हिरे व्यापारी भदानी यांच्याकडून ४६ लाख ४६ हजार ९५० रुपये किंमतीचे आणखी हिरे नेले. त्यानंतरही अनेक दिवस झाल्यानंतर व्यापाऱ्याचे पैसे आले नाहीत.
हिरे व्यापाऱ्याने दलालाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान, त्यांनी तपासणी केली असता दलालाने आणखी एका हिरे व्यावसायिकाकडून ६० लाख ७५ हजार ७०० रुपये किंमतीचे हिरे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले. ते कळल्यावर त्यांना धक्का बसला. अखेर, त्यांनी बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.