मुंबईच्या रस्त्यांवर कूलकॅब, प्रीपेड, अॅपआधारित टॅक्सींची चलती
मुंबईच्या धावत्या जीवनक्रमातील अविभाज्य घटक बनलेली काळीपिवळी टॅक्सी आता हळूहळू हद्दपार होऊ लागली आहे. या महानगरीशी एकरूप झालेल्या काळय़ापिवळय़ा रंगाच्या टॅक्सी एके काळी रस्त्यावरच नव्हे, तर हिंदी चित्रपटांच्या कथासूत्राभोवती फिरत असायच्या; पण जागतिक शहर बनण्याच्या दिशेने धावत चाललेल्या मुंबापुरीने काळीपिवळीची सीट सोडून वातानुकूलित, प्रीपेड आणि अॅपआधारित कॅबला इशारे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत काळीपिवळी टॅक्सींची संख्या निम्म्यावर आली असून आता अशा टॅक्सी चालवण्यासाठी चालकही मिळेनासे झाले आहेत.
काळीपिवळी टॅक्सी हे केवळ मुंबईच्या वाहतुकीचे साधन नव्हते. त्या काळी अशा टॅक्सीतून प्रवास म्हणजे सुखवस्तूपणाचे लक्षणही मानले जात होते. काळीपिवळीची वर्दळ मुंबईच्या वाढत्या पसाऱ्याचा एक भागच बनली होती. मात्र, गेल्या दशकभरापासून विविध कारणांमुळे अशा टॅक्सींच्या संख्येत घट होऊ लागली आहे. सहा वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर ५८ हजार काळ्यापिवळ्या टॅक्सी धावत होत्या. त्यानंतर दोन वर्षांत हा आकडा ३८ हजारांवर पोहोचला. सध्या हाच आकडा २३ हजारांवर पोहोचला आहे.
जुनाट टॅक्सींना मागे टाकत नव्याकोऱ्या आणि वातानुकूलित टॅक्सी रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे जुन्या टॅक्सीवर चालक मिळत नसल्याचे अनेक टॅक्सी धूळ खात पडल्या आहेत. अॅपआधारित टॅक्सींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काळीपिवळी टॅक्सीच्या तुलनेत चालकांना रोजचा मोबदला अधिक मिळत असल्याने चालकांकडून काळीपिवळी टॅक्सीकडे पाठ फिरवली जात आहे.
सध्या टॅक्सीचे १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २२ रुपये आहे. हे भाडे अॅपबेस टॅक्सींच्या तुलनेत अधिक आहे. मात्र यातही काळीपिवळी टॅक्सींच्या अनेक गाडय़ा रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवासी चालकांवर नाराजी व्यक्त करत असतात. परिणामी टॅक्सीचालकांकडून जुन्या गाडय़ा चालवण्यास नकार दिला जात असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर भाडे नाकारणारा टॅक्सीचालक आणि प्रवासी यांच्यातील संघर्ष ही नवीन बाब नाही. यात गेल्या वीस वर्षांपूर्वी ज्यांनी टॅक्सी व्यवसाय सुरू केला अशा टॅक्सी मालकांना किंवा चालकांना त्यांच्या टॅक्सी चालवण्यासाठी चालक मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षांत ४० टक्के टॅक्सी रस्त्यावर धावत नाहीत. परिणामी टॅक्सींच्या संख्येत घट झाली आहे.
– ए. एल. क्वाड्रोस, अध्यक्ष, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन