शेअर बाजाराच्या व्यासपीठाचा वापर करून काळ्या पैशाला सनदशीर रूप देणारी ‘दुकाने’ सुरू करणाऱ्या संघटित टोळ्यांवर भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ची वक्रदृष्टी वळली असून, त्यांच्यामार्फत आजवर ५,००० ते ६,००० कोटी रुपयांचा कर बुडविला गेला असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. ‘सेबी’ने कारवाई म्हणून ९०० कंपन्यांच्या बाजारातील वावरावर बंदी आणणारा आदेश बजावला असून, अधिक चौकशीसाठी त्यांची प्रकरणे प्राप्तिकर विभागाला सुपूर्द केली आहेत.
सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही ९०० कंपन्यांवर बंदीची कारवाई केली आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांच्यामार्फत झालेल्या करचुकवेगिरीचे प्रमाण पाच ते सहा हजार कोटी रुपयांच्या घरातील असेल. हा सारा तपशील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिला गेला आहे आणि त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी, असे आपण सुचविले आहे.’’
आर्थिक अफरातफर आणि शेअर बाजाराशी संलग्न अन्य लबाडीच्या व्यवहारांवर प्रकाश टाकताना, या प्रत्येकाबाबत कठोर पाऊल टाकत प्रत्येक अपप्रवृत्तीला एकामागोमाग एक संपुष्टात आणले जाईल, असे सिन्हा यांनी सांगितले. प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ), डिपॉझिटरी रिसीट्स ही प्राथमिक बाजारपेठ असो अथवा प्रत्यक्ष समभाग खरेदी-विक्री विनिमय होणारी बाजारपेठ असो, अनेक प्रकारच्या लबाडय़ा करणाऱ्यांविरुद्ध आमचा निरंतर लढा सुरूच असला तरी आम्हाला सर्वच गोष्टींवर नियंत्रण मिळविता आले असे मात्र म्हणता येणार नाही, अशी पुस्तीही सिन्हा यांनी जोडली.
‘‘कोणताही देश असो अथवा बाजार व्यवस्था असो, कायद्यातून पळवाटा शोधून लबाडी करणारे सगळीकडेच असतात. गुन्हेगारी उद्देश असलेल्या या मंडळींची ही कृती देशाच्या अर्थवृद्धीला निश्चितच हातभार लावणारी नसते. जास्तीत जास्त पैसा ओरबाडण्याचा उद्देशच त्यामागे असतो,’’ अशा शब्दांत सिन्हा यांनी या प्रवृत्तीचा समाचार घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा