‘करून दाखविले’ अशी जोरदार जाहिरातबाजी करीत लोकार्पण करण्यात आलेल्या दादरच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावाला गळती लागल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून या तलावातून होत असलेल्या गळतीचा शोध घेण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. मात्र बांधकामानंतर पाच वर्षांतच गळती सुरू झाल्याने जलतरण तलावाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव कायमचे काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने ‘करून दाखविले’ अशी टिमकी वाजवीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महात्मा गांधी जलतरण तलावाचे लोकार्पण केले. हा जलतरण तलाव २०११ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आला. निविदा न मागविताच या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या बी. जी. शिर्के कंपनीला जलतरण तलाव बांधण्यासाठी ४२ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते. मात्र कामाच्या मूळ प्रस्तावात तब्बल चार वेळा फेरफार करण्यात आले. परिणामी, प्रकल्प खर्च तब्बल ६७ कोटी रुपयांवर पोहोचला. उंचावरून सूर मारण्यासाठी, स्पर्धासाठी, जलतरणाचे धडे घेणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी असे चार जलतरण तलाव येथे बांधण्यात आले. फेब्रुवारी २०१२ मध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांमध्ये श्रेय लाटण्यासाठी तलावाचे उद्घाटन उरकण्यात आले. नंतर तक्रारी येऊ लागल्याने मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १२ जानेवारी रोजी येथील चारही जलतरण तलाव पाण्याने पूर्ण भरण्यात आले आणि २० जानेवारी रोजी तरण तलावाची पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये स्पर्धेसाठीच्या तरण तलावाची पाणी पातळी ०.४३ मीटरने, तर सूर मारण्यासाठी उभारलेल्या जलतरण तलावाची पाणी पातळी ०.९० मीटरने कमी झाल्याचे आढळले. आता दोन्ही जलतरण तलाव पूर्ण रिकामे करून पुन्हा पाण्याने भरण्यात आले असून पाण्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. पाच वर्षांमध्येच या जलतरण तलावाला गळती लागली असून यावरून तलावाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बी. जी. शिर्के कंपनीकडून तलावाची दुरुस्ती करून घ्यावी आणि या कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader